कर्नाटकातून गोवा हद्दीत गुरांची तस्करी करणारी वाहने मोलम चेक नाक्यातून जात आहेत बिनधास्त

कर्नाटकातून गोवा राज्यात गुरांची तस्करी सध्या पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे. तर सदर तस्करी अनमोड मार्गे गोवा हद्दीतील मोलम चेक नाक्यावरून होत आहे. तर मोलम चेक नाक्यावर तस्करी करणाऱ्या वाहनांना जणू हिरवा सिग्नलच मिळाल्याप्रमाणे वाहने जाण्यास सुरूवात झाली आहेत. यापूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात आलिशान अशा असणाऱ्या फॉर्च्यूनर, इनोवा, स्कॉर्पिओ अशा विविध वाहनातून बीफ ची तस्करी गोवा राज्यात होत होती. परंतु सदर बीफ ची तस्करी करतेवेळी एखाद्याने वाहन तपासले अथवा अडवल्यास मोठे नुकसान सोसावे लागत असल्याने आता थेट गुरांची तस्करी पूर्णता पॅक बंद असणाऱ्या आयशर वाहनातून होऊ लागली आहे. तर अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आत असणाऱ्या गुरांना वारा खेळण्यासाठी वाहनाच्या वरील भाग खुला ठेवण्यात येतो. व एखाद्या वेळेस सदर वाहन पकडल्यास एखादा दिवस वाहन थांबवून कोणती ना कोणती गुरे वाहतुकीची कागदपत्रे दाखवून सेटलमेंट ही करण्यात येते. तर जास्तीत जास्त प्रमाणात सदर तस्करी मोलम चेक नाक्यावरून होत आहे.